कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून परिणामी जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर धरण पांडू क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे. याचाच परिणाम पाहता पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर आली आहे. तर, जिल्ह्यातील 40 पेक्षा अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
कोल्हापुरात गेले दोन दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढला असून नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगेच्या सध्याची पाणी पातळी 30 फूटांनी वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातले 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर, 40 पेक्षा अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. आजही कोल्हापूरला रेड अलर्ट असून पावसाचा जोर असाच राहिल्यास आज पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते.
मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणातून अकराशे क्युसेक्सचा विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, हातकणंगले करवीर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा, असे आवाहन प्रशासनानं नदी किनाऱ्यावरील नागरिकांना केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनीही पूरपरिस्थितीची माहिती घेतली असून दोन एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. एक कोल्हापूर तर दुसरं पथक शिरोळमध्ये तैनात केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 5 जुलै ते 9 जुलै या कालावधीत कोल्हापूरला रेड अलर्ट दिला आहे.