पणजी – गोव्यातील भाजपाच्या आमदार एलिना सलढणा यांनी गुरुवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन रात्री उशिरा दिल्लीत जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या अंतर्गत त्रासाला कंटाळून एलिना सलढणा यांनी आमदारकीचा राजीनामा गुरुवारी सकाळी विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सुपुर्द केला होता. त्या कोर्टालीम मतदारसंघाच्या आमदार होत्या.
एलिना सलढणा या मागील काही दिवसांपासून पक्षीय नेतृत्वावर नाराज होत्या. त्यांच्याच तालुक्यातील भाजपाचे बडे नेते आणि राज्याचे वाहतूक आणि पंचायत मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांच्याकडून त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू होते. एलिना सलढणा आणि म्हाव्हीन गुडीन्हो यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकिटावरून धुसफूस सुरू होती. अखेर या त्रासाला कंटाळून सलढणा यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. पक्षाच्या त्रासाला व गोव्यात चाललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आप मध्ये प्रवेश –
दरम्यान आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील पक्षाचे नेते राहुल म्हाम्बरे व वाल्मिकी नायक उपस्थित होते.