चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात बैलगाडा मालकांनी जल्लोष केला आहे. परंतु, चिपळूणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान पाच वर्षाच्या मुलाच्या अंगावरून बैलगाडा गेल्यामुळे चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चिपळूण मधील कळमुंडीमध्ये रविवारी 14 तारखेला बैलगाडा स्पर्धा पार पडली. परंतु, या बैलगाडा स्पर्धेला गालबोट लागले आहे. या स्पर्धेच्या दरम्यान पाच वर्षाच्या मुलाच्या अंगावरून बैलगाडा गेल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. उधळलेल्या बैलाने लहान मुलाला अक्षरशः तुडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जखमी मुलावर कराड मधील रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. हा जखमी चिमुकला चिपळूण मधील कोंढे गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी जोखीम पत्करून होणारी गर्दी चिंतेचा विषय बनला आहे.