सतेज औंधकर | कोल्हापूर : उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. कार्यक्रमानंतर उद्योग मंत्री सामंत यांनी प्लॅस्टिक पुनर्निर्मितीप्रकल्पाला भेट दिली. तसेच 'पंचमहाभूत बोध' प्रयोग पाहून यातून पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
उदय सामंत म्हणाले, वायू आणि जल प्रदूषणापासून पृथ्वीला वाचविण्याची गरज आहे. उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण उद्योग निर्मितीनंतर त्याचे दुष्परिणाम समाजातील अन्य घटकांवर होवू नयेत, यासाठी उद्योजकांनी स्वत: आचारसंहिता घालून घ्यावी. समाजासाठी काहीतरी देणं देण्याच्या हेतूने उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सी.एस.आर.) चा उपयोग पृथ्वी वाचविण्यासाठी करावा.
कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. तीस दिवसांत उद्योगांसाठी परवाना देणारा कायदा येत असल्यामुळे उद्योगवाढीला गती मिळेल. परंतु, उद्योग-धंद्यांमुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी उद्योजकांनी घ्यायला हवी.
भविष्यात जे काही करता येईल, ते पर्यावरणासाठी उपयुक्त असेल, अशी खूणगाठ बांधून यासाठी उद्योजकांनी पुढे यावे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महत्वपूर्ण काम करणारे कणेरी मठ नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सर्वात पुढे राहिले आहे. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांची व पर्यावरणाची काळजी घेण्याचा स्वामीजींचा संदेश सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांना राज्य शासन निश्चतपणे मदत करेल, असे सामंत यांनी सांगितले.
जीवनात ध्येय निश्चत करा. तीव्र इच्छाशक्ती बाळगा, ध्येय पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम करा, असे सांगून भारतीय आयुर्वेदात मोठमोठ्या आजारांवर मात करण्याची ताकद असून त्याचा प्रसार विदेशात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे विचार उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून विश्वस्त संतोष पाटील यांनी या लोकोत्सवाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी झाले.