छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात विद्यापीठाने तक्रार देऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, यासाठी आज विविध आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंद ची हाक दिली होती. बंदच्या हाकेला प्रतिसाद देत उस्फुर्त पणे शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
सकाळी 11 वाजता रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, एम आय एम विद्यार्थी आघाडी, एन एस यु आय, प्रहार, सत्यशोधक, संशोधक विद्यार्थी कृती समिती, राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी विविध विभागात जाऊन विद्यार्थ्यांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तर रिडींग रूम द्वार येथे सभा घेण्यात आली. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
प्र.कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन येत्या 2 दिवसात अभाविपच्या कार्यकर्त्यांविरोधात विद्यापीठ प्रशासनाने तक्रार द्यावी, व झालेल्या नुकसानीची भरपाई करावी. तसेच ठिकठिकाणचे बंद स्ट्रीट लाईट चालू करावे, अभाविप ला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी ह्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
बंद दरम्यान पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे, पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे उपस्थित होते.