22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्याच गर्दीतील भक्तांकडून राम लल्लाच्या चरणी इच्छादान करण्यात येतंय. रामलल्लाच्या दर्शनासाठी राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे, या कालावधीत दानपेटीतही मोठी रक्कम जमा झाली आहे.
अवघ्या चार दिवसांत राम भक्तांनी 7 कोटी 8 लाख रुपयांचे दान दिले आहे. ही रक्कम राम मंदिराच्या न्यास समितीने ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने स्वीकारली आहे. 23 जानेवारीला रामलल्लाचे दर्शन सुरु झाले. या पहिल्या दिवशी 2 कोटी 90 लाख रुपयांचे दान मिळाले होते. तर दुसऱ्या दिवशी 24 जानेवारीला 2 कोटी 43 लाख रुपये तसेच तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात दान मिळाले होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार चार दिवसांत लोकांनी 7 कोटी 8 लाख रुपयांचे दान केले आहे.
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली प्रभू श्रीरामाची बालस्वरूपातील मूर्ती मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती एकाच दगडात साकारण्यात आली आहे. ही मूर्ती काळ्या रंगाच्या खास दगडात कोरली आहे. या मूर्तीसाठी खास दगडाची निवड करण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या बालस्वरुपातील मूर्तीसाठी कृष्ण शिला दगडाचा वापर करण्यात आला आहे.