भारत गोरेगावकर । कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे व दरड कोसळलेच्या घटनेंमुळे अनके संसार उध्वस्त झाले, कांहींचे तर संसार नुकतेच थाटणार होते. मात्र होते तितकंच सर्वच पुरात वाहून गेल्याने हे संसार थाटण्याआधीच मोठ्या अडचणीत सापडले आहे. अशाच एका नवीन संसार थाटणाऱ्या वधूच्या लग्नाची जबाबदारी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उचलली आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी रविवारी रायगडच्या दरड ग्रस्त भागाचा दौरा केला. सय्यद यांनी पोलादपूर तालुक्यातील धामणी वाडी, आंबेमाची, साखर सुतारवाडी या गावांना भेटी देत दरडी कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सय्यद यांनी तेथील दरडग्रस्त कुटुंबांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
दरम्यान साखर सुतारवाडी येथील पूजा चव्हाण हिच्या लग्नासाठी पै पै जमवलेले दागिने दरडीखाली गाडले गेल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी दीपाली सय्यद यांनी पूजा चव्हाण हिची विचारपूस करत तिला आधार दिला. तसेच पूजाच्या लग्नाची जबाबदारी आपल्या संस्थेमार्फत उचलण्यात येणार असल्याचे सय्यद यांनी जाहीर केले. यामुळे पूजाला काहीसा हातभार मिळाला आहे. तसेच याआधी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली होती.