टाटा समूहाचे माजी अध्यक्ष राहिलेले सायरस मिस्त्री यांचा आज पालघर येथे अपघातात निधन झाले आहे. हा अपघात कसा झाला यांचे कारण अद्यापही समोर आले नाहीय. मात्र, सायरस मिस्त्री हे त्यांच्या मर्सिडीज कारमधून जात असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.
सायरस मिस्त्री यांचा जीवनप्रवास
4 जुलै 1968 रोजी सायरस मिस्त्री यांचा जन्म झाला. सायरस यांचं शिक्षण लंडनमध्ये इंपिरिअल कॉलेज येथे झाले. त्यांनतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण लंडन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये घेतलं. तिथे त्यांनी मास्टर ऑफ सायन्स मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केली. ते इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सचे फेलोदेखील होते. लंडनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या कौटुंबिक व्यवसायात महत्त्वाच्या व्यवस्थापकीय जबाबदा-या त्यांनी पार पडल्या. टाटा ग्रुपशिवाय ते शापूरजी पालनजी अँड को., फोर्ब्स गोकॅक, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि युनायटेड मोटर्स इंडिया यांसारख्या कंपन्यांचे डायरेक्टर पददेखील त्यांनी भूषवले आहे. सप्टेंबर 2006 मध्ये ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळावर अवघ्या 38 व्या वर्षी सायरस यांच्या झालेल्या निवडीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
कौटुंबिक पार्श्वभूमी
बांधकाम उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसलेल्या आणि तब्बल 8.8 अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या पालनजी शापूरजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा म्हणजे सायरस मिस्त्री. अनेक वर्षांपासून मिस्त्री आणि टाटा कुटुंबात कौटुंबिक ऋणानुबंध होते. मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहातील पालनजी मिस्त्री यांचे पुत्र असून त्यांच्याकडे टाटा सन्सचे तब्बल 18.5 टक्के समभाग आहेत.
रतन टाटा यांचे मिस्त्री उत्तराधिकारी
रतन टाटा यांचे उत्तराधिकारी कोण होणार अशी चर्चा त्यावेळी दोन-तीन वर्षं सुरू होती. त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून शापूरजी पालनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस मिस्त्री हे आता टाटा समूहाचे प्रमुख होणार अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर ते प्रकाश झोतात आले.
टाटा आणि मिस्त्री मध्ये मतभेद
2016 साली टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर मिस्त्री यांनी या निर्णयाला आव्हान दिले होते. टाटा समूहाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालच्या आदेशाला स्थगिती देत 26 मार्च 2021 रोजी टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला. तसेच, न्यायालयाने टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर मिस्त्री राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.