मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाच्या मुद्दावरुन एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे राज्यसभा खासदार म्हणून मुदत संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे हे आज (12 मे) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या आगामी राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत. संभाजीराजे यांना ६ वर्षांपूर्वी भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. तेव्हापासून ते या पक्षाचे सहयोगी सदस्य होते. मात्र पक्षाच्या व्यासपीठापासून ते कायम दूर राहिले. आता खासदारकीची मुदत संपल्यानंतर ते नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
संभाजी राजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापना करुन, मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करु शकतात. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी मिळण्यात फडणवीस यांचंही योगदान असल्याने आपण त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं असलं तरी विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांबरोबर चर्चा करून संभाजीराजांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.