विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन कालपासून नॉट रिचेबल आहे. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. आता यासंदर्भात भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान केले आहे.
“सीआर पाटील आणि एकनाथ शिंदेंची कुठेतरी ओळख झाली असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे अपील केलं असेल. एकनाथ शिंदेंचं कुणीतरी ओळखीचं असेल गुजरातमध्ये म्हणून गेले असतील. तिथे सुरक्षित वाटलं असेल त्यांना. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल हा शिवसेनेतील अंतर्गत वाद आहे.”
राज्यसभेला १२३ आणि विधान परिषदेला १३४ संख्याबळ झालं. तर भविष्यात बदल घडेल का? या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आताच्या परिस्थितीत एखादा प्रस्ताव आला तर कोण नाही म्हणेल. महाविकास आघाडी टिकेल की नाही हे सांगता येणार नाही पण आता जर एखादा प्रस्ताव आला तर तो नाकारण्या इतकं भाजप मूर्ख नाही. आम्ही राजकीय पक्ष, एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव आल्यास आम्ही स्विकारू. संजय राऊत यांच्या महान नेतेगिरीमुळे शिवसेना अडचणीत आली. आम्ही शिवसेनेसोबत काम केलंय, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम आहे. संजय राऊत शिवसेनेचं भयंकर नुकसान करत आहेत. ते नुकसान करण्याचं काम त्यांना कुणीतरी दिलंय, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
“महाविकास आघाडीमध्ये गेल्या अडीच वर्षात पूर्ण राष्ट्रवादीकडूनच कारभार केला जात होता. त्यामुळे सरकारमध्ये खदखद होती ती आता फुटली आहे. आता यामुळे सरकार धोक्यात आहे की, दुसरं सरकार बनेल का याचा अंदाज लावणं घाईचं ठरेल.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.