मुंबई : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (शांताराम तलाव) आणि स्वा. सावरकर मैदान व संरक्षक भिंतीवरील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा २७ जून २०२३ रोजी संपन्न झाला. आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते मालाड (पूर्व) येथील विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल माध्यमातून मालाडमधील विकासकामांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केले होते.
मुंबई शहर आपल्या देशाचा मानबिंदू आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत पायाभूत सुविधा या जागतिक स्तराच्या असल्या पाहिजे असा आमचा आग्रह आणि प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मेट्रो जाळे, खड्डेमुक्त रस्ते, सुशोभीकरणाचे मोठे प्रकल्प अशी मोठ मोठी कामे हाती घेतली जात आहेत. वर्षानूवर्षे येथे होत असलेला गणेशोत्सव, नवरात्री आणि छटपुजा दरम्यान आता नागरिकांना नक्कीच सुखद अनुभव येईल. या उद्यानाबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाच्या नुतनीकरणाचे कामसुद्धा उत्तम झाले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धांसाठी ते आता सज्ज झाले असून खेळाडूंना तिथे नवी अनुभूती येईल, असा मला विश्वास आहे. तसेच विकासकामांमुळे मालाड प्रभाग क्र. ४३ चा चेहरा मोहरा बदललेला आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
आमदार मिहीर कोटेचा यांनीसुद्धा मालाडमधील विकासकामांचे कौतुक केले. केंद्र आणि राज्यातील सरकारच्या स्वच्छ आणि पारदर्शी कामामुळे विकासकामे वेगात होत आहेत. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे अद्भूत, सुंदर आणि स्वच्छ वास्तू उभ्या राहू शकतात याची प्रचिती मालाड पूर्व येथील तलाव, उद्यान आणि मैदानाच्या माध्यमातून मिळाली आहे, असे कोटेचे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (शांताराम तलाव) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान व संरक्षक भिंतीवरील सुशोभीकरणाचे कोटेचा यांनी ही विशेष कौतुक केले.
पी उत्तर विभाग मालाड पूर्व व पश्चिम येथील एकून अठरा नैसर्गिक तलावांपैकी एक असणारा हा तलाव असून स्थानिकांच्या धार्मिक भावना त्यासोबत जोडलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि तलावाचे सुशोभिकरण करताना त्यात अत्याधुनिक रोषणाई तसेच सर्व वयोगटातील नागरिकांचा विचार करुन बैठक व्यवस्था तसेच मनोरंजन साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तलावात मासे, कासव, बदक आणि हंस मोठ्या प्रमाणात आहेत. धकाधकीच्या जीवनात मालाडवासियांना सुख, शांती आणि समाधान तसेच उत्तम आरोग्यासाठी या उद्यानाचा मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान आणि संरक्षक भींतीचे सुशोभीकरणही भव्य-दिव्य पद्धतीने करण्यात आलेले आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करुन स्थानिकांचे जीवन अधिक सुखकर आणि आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न या विकासमकामांद्वारे झालेला आहे.