संजय देसाई | सांगली : शिवसेना (Shivsena) महिला नगरसेविकेच्या पतीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे गटात (Shinde Group) येण्यासाठी ही मारहाण केल्याचा आरोप महिला नगरसेविकेने केला आहे. तर पोलिसांकडून निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. शिवकुमार दिनकर शिंदे असे शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पती शिवकुमार शिंदे यांना मारहाण करण्यात आली आहे. सकाळी सात ते आठ जणांच्या टोळीने शिवकुमार शिंदेंना मारहाण केली असून यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणी नंतर शिंदे यांना भारती हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या एका पायाला गंभीर जखम झाली आहे व दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर आहेत.
या मारहाणीवरुन आता सांगलीत राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गटातील सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा जखमी शिंदेंनी आरोप केला आहे. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आनंद पवार हे शिंदे गटात प्रवेश करा, अशा धमक्या देत होते. त्यामुळे ही मारहाण झाल्याचे नगरसेविका आणि शिवकुमार शिंदेंनी सांगितले.
तर पोलिसांनी शिंदे गटातील सहा ते सात जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, आगामी निवडणुकीसाठी ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.