लोकशाही न्यूज रिपोर्ट
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी समाजसेवक आण्णा हजारे ३० जानेवारीपासून आंदोलन पुकारणार होते. कोरोनाच्या संसर्गामुळे गर्दी टाळून राळेगण सिद्धीत उपोषण सुरू करणार असल्याची माहिती अण्णांनी दिली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अण्णांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फडणवीसांची शिष्टाई कामी आल्याचे चित्र आहे. काही मागण्या मान्य झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा निर्णय स्थगित केला आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अण्णांच्या मगण्यांवर समिती स्थापन करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसेच अण्णा सुचवतील त्या व्यक्ती शेतकऱ्यांच्या समितीवर जाणार असल्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे अण्णा हजारे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू होते. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अण्णांच्या भेटीस गेले होते. अखेर बैठकीनंतर अण्णा हजारे आंदोलन करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे.