राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानी ईडीने (ED) छापा टाकला आहे. सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून (Shivsena) संताप व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya), केंद्रीय यंत्रणा तसेच भाजप (BJP) सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे, मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केला होता. आणि त्याप्रकारे कारवाई होते, अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे. असं वक्तव्य अजित पवारांनी केला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहित नाही. राजकीय सुडपोटी कारवाई नको. यंत्रणांच्या कामात पारदर्शीपणा पाहिजे. माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती. तपास पारदर्शी होत असेल, तर कुणाची ना नाही. असं अजित पवार यावेळी म्हणाले.