अमरावती : अब्दुल सत्तार कृषी मंत्री झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात बोरगाव धांदे, कासारखेड, रायपूर येथे जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली. परंतु, त्यांनी रात्रीच्या अंधारात ही पाहणी केल्याने कृषीमंत्र्यांना अंधारात नेमकं काय नुकसान दिसलं, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे, कासारखेड, रायपूर येथे जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली. रात्रीच्या अंधारात शेतीत जाऊन सत्तारांनी अतिवृष्टीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचं सांत्वनही केलं. भाजप शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, या रात्रीच्या अंधारात कृषी मंत्र्यांना नेमकं काय नुकसान दिसलं हा सवाल आता उपस्थित होत आहे.
सत्तार यांचा दुपारी 2 वाजताचा दौरा तब्बल चार तास उशिरा झाला. दरम्यान उद्या कृषी मंत्री सत्तार अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेउन पत्रकार परिषद घेणार आहे.