इम्तियाज मुजावर | सातारा: जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचा फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. आज पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीने आज तू कोंडी झाली पर्यटकांचे हाल झाले. आजच्या वाहतूक आणि पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.
कास पठार फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मागील काही दिवसांपासून कास पठार पर्यटकांच्या गर्दीने भरभरून वाहत आहे. कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे झाले असून अजून काही दिवसच हा फुलोस्तव पर्यटकांना पाहता येणार आहे. शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवस असल्याने मोठी गर्दी होती. आज दुपारनंतर आलेल्या पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. ऑनलाईन बुकींग करून साधारणपणे पाच हजार लोक येतात तर थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच हजारांच्यावर होती.
दहा हजारांहून अधिक पर्यटक एकाच दिवशी आल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली. समितीने ऑफलाईन आलेल्या पर्यटकांचे बुकिंग दुपारनंतर बंद केल्याने वाहनतळावर वाहनांसाठी जागाच उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या केल्या. त्यामुळे पर्यटकांना चालत जाणे ही दुरापास्त झाले. आज रविवार असल्याने सातारा शहरापासूनच येवतेश्वर घाट आणि कास पठारपर्यंत 22 किमी अंतरापर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून नेहमी प्रमाणे वाहतूक कोंडी झाली. सातारा तालुका पोलिसांनी वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनांची संख्या जास्त असल्याने त्याचे प्रयत्नही तोकडे पडले. कास समितीची मोठ्या गर्दीपुढे ही यंत्रणा तोकडी पडल्याचे दिसून आले.
कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे झाले असून अजून काही दिवस राहणार आहेत. त्यामुळे शनिवार व रविवार व्यतिरिक्त ही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या दररोज फक्त बुकिंग करून येणाऱ्या लोकांनाच प्रवेश देणे आवश्यक आहे. कास पठारावर एकाच ठिकाणाहून प्रवेश दिला जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी एकाच ठिकाणी एकत्र येवून पर्यटकांसह यंत्रणेचे ही हाल होत आहेत. त्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या गावांतील पर्यायी मार्गाचा वापर केल्यास गर्दी टाळून पर्यटन सुलभ करता येणार आहे. यासाठी पर्यायी मार्गाचा विचार व्हावा असे पर्यटकांचे मत आहे. कास पठारावर सध्या ऊन-पावसाचा खूपच सुंदर खेळ सुरू आहे. सर्वत्र फुलांचे गालीचे तयार झाले आहेत. फुले पाहताना मनाला खूपच आनंद मिळत आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे.