मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. निवडणुकीत स्थानिक आघाड्या आणि पॅनेल ताकतीने उतरल्या असून गाव कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रायगड जिल्ह्यात 15 ग्रामपंचायतीच्या 116 जागा तर थेट सरपंचाच्या 16 जागांसाठी मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यात आज ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सदस्य पदासाठी 247 तर सरपंच पदासाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून 61 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. तर, 309 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
साताऱ्यात जानेवारी 2021 ते 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 5 ग्रामपंचायती पूर्णत: तर 7 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. अन्य 4 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये एकूण 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील घाणव, मोरगिरी, महाबळेश्वरमधील मोळेश्वर, जावलीतील भणंग या ग्रामपंचायतची मुदत संपल्याने या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यातील सहा ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. रविवारी 88 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होणार आहे. यातील मुल 3 ,चिमूर 4 ,भद्रावती 2 ,ब्रह्मपुरी 1, कोरपना 25 ,जिवती 29, तर राजुरा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.