अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovindam) यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली आहेत. आता लोकसभेत या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) उत्तर देत आहेत. यावेळी ते विरोधी पक्षांनी जे विविध मुद्दे उपस्थित केले त्याबाबत आणि सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट करत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर हल्लबोल केला आहे.
देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. लॉकडाऊनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मुंबईतील कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी तिकीट काढून दिले. लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रावरील भार कमी करण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. कोरोना काळात काँग्रेसने हे मोठं पापं केलं. गोंधळाचं वातावरण निर्माण करण्यात आलं, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.
कोरोना महामारित काँग्रेसने अनेक समस्या निर्माण केल्या. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा कोरोना संकट मोठ्या प्रमाणात वाढलं. हे कशा पद्धतीचं राजकारण आहे. अशा प्रकारचं राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. मागील दोन वर्षांपासून देश कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे, असं मोदी म्हणाले.
दिल्लीतील सरकारनं गाड्यांवर माईक आणि स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगाराना आणि मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितलं. त्यांच्यासाठी बसची सोय करून दिली. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त नव्हता. मात्र, कोरोना संकट वाढवण्याचं पाप हे काँग्रेसने केलंय,अशा प्रकारचा गंभीर आरोप करत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. काँग्रेसचा अनेकदा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही. काँग्रेसच्या भूमिका आणि वक्तव्य पाहिली तर 100 वर्षं सत्ता येऊ नये यासाठी जणू त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं असा टोला त्यांनी लगावला.