नेहरू विद्यापीठाची (JNU) कमान पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती सोपवण्यात आली आहे. विद्यापीठाला पहिली महिला कुलगुरू मिळाली आहे. प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची JNU च्या नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन कुलगुरु जगदीश कुमार यांनी सोमवारी प्राध्यापक पंडित यांच्याकडे पदभार सोपवणार असल्याचे सांगितले आहे. प्रोफेसर एम. जगदीश कुमार जेएनयूचे कुलगुरू होते. आता त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. JNU VC म्हणून जगदीश कुमार यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2021 रोजी संपला.
शांतीश्री धुलीपुडी या सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. प्राध्यापक शांतीश्री पंडित यांना शिकवणीचा जवळपास 34 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त गोवा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, रक्षाशक्ती विद्यापीठ, मद्रास विद्यापीठात काम केले. याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे. प्राध्यापक पंडित यांचे वडील सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते. तर आई लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू भाषेच्या प्राध्यापिका होत्या.