कोणत्याही कारणास्तव स्क्रीनसमोररचा वाढलेला वेळ आरोग्यासाठी घातक असतो तसेच तो डोळ्यांच्या आरोग्यासाठीही घातकच ठरतो. अनेक लोकांना डोळ्यांना थकवा येणे, कोरडेपणा येणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोकेदुखी, डोळ्यांना खाज सुटणे अशी बरीच लक्षणे जाणवतात. अशा वेळी आपण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आपणच आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायची गरज असते. डोळ्यांचा योग किंवा डोळ्यांचे व्यायाम आपल्या डोळ्यांना आराम देऊन त्यांना पुन्हा ताजेतवाने करण्यास मदत करतात.
हे व्यायाम आपण का करावेत?
डोळ्यांचा योग हा संगणकासमोर बसल्याने डोळ्यांना होणाऱ्या त्रासावर उपचार करण्याचा एक अत्यंत सोपा व प्रभावी मार्ग आहे. CVS हे सर्वसामान्यपणे डोळ्यांना जाणवणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासांचे नाव आहे. यालाच डिजिटल ताण असेही म्हणतात. डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी, मान व खांदे दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांची अतिरिक्त उघडझाप होणे, डोळ्यांना थकवा येऊन डोळे दुखणे, डोळे जड होणे, दृष्टी धूसर होणे, डोळ्यांची एकाग्रता न होणे, डोळ्यांची शक्ती वाढवणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. गेल्या काही वर्षात यंत्रांच्या अतिवापरामुळे लहान मुले व तरुण वर्गांमध्ये CVS चे प्रमाण वाढते आहे.
व्यायाम कधी व कसा करावा ?
1. कामातून थोडी विश्रांती घेऊन २०-२०-२० हा नियम वापरा. (म्हणजेच २० फूट अंतरावर नजर ठेवून दर २० मिनिटांनी २० सेकंदांचा विराम घ्या).
2. पाल्मिंग- डोळ्यांना आराम देऊन पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी सर्वोत्तम आणि अतिशय महत्वाचा व्यायाम आहे. हातांचे तळवे एकमेकांवर घासून त्यामध्ये उष्णता व उर्जा निर्माण करा. हे गरम झालेले तळवे दोन्ही डोळ्यांवर ठेवा, असे करत असताना शरीर सैल सोडून दीर्घ श्वास घेत राहा. तासनतास स्क्रीनसमोर बसल्यानंतर किंवा पुस्तक वाचल्यानंतर हा व्यायाम करावा.
3. डोळ्यांना मसाज करा- आपण स्क्रीनसमोर बसलेले असतो तेव्हा डोळ्यांभोवतीच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांना धूसर दिसते आणि डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांभोवती गोलाकार मसाज केल्याने डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या नसा सैल होऊन दृष्टी स्वच्छ होते. अंगठ्याच्या सहाय्याने हलकेच दाब देत बुबुळापाशी, भुवयांच्या खाली व डोळ्यांभोवती अंगठा फिरवा. डोळ्यांची बुबुळे काळजीपूर्वक दाबा. अशाप्रकारे 3 वेळा करा.
4. थंड गुलाबपाण्यात कापूस भिजवणे - ही क्लुप्ती मुलांसाठी व्यायाम म्हणून वापरावी. यामुळे मुलांच्या डोळ्यांना आराम पडतो व डोळ्यांचे जडत्व जाऊन डोळे शांत होतात. कापूस गुलाबपाण्यात भिजवा आणि २-३ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. जास्त वेळ ऑनलाईन शाळा किंवा डिजिटल/ व्हिडीओ बैठका झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा असे करायला हरकत नाही.