बीड : टोमॅटोच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असून सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. परंतु, दुसरीकडे बऱ्याच वर्षांनी टोमॅटोला भाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशात, टोमॅटो भाववाढीवर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी वक्तव्य केलं होतं. यावरुन त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. तर, कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळीतून सुनील शेट्टी यांना थेट टोमॅटोचे कुरिअर पाठविण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांच्या परळीतून अभिनेते सुनील शेट्टी यांना टोमॅटो कुरियर करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर वाढल्या संबंधितचे ट्विट सुनील शेट्टी यांनी केले होते. त्याचेच पडसाद सर्व स्तरावरतून पाहायला मिळाले. याचाच निषेध म्हणून आज परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शेट्टी यांना टोमॅटो कुरिअर केले आहेत. परळीतील भाजीपाला मार्केटमधून आठ किलो टोमॅटो खरेदी करत याचं पॅकिंग करून हे टोमॅटो कुरिअर करण्यात आले. राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष संतोष मुंडे यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
काय म्हणाला होता सुनील शेट्टी?
आजकाल मी टोमॅटो कमीच खातो, लोकांना वाटते की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. परंतु असं नाही आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते, असे वक्तव्य सुनील शेट्टीने केले होते. त्यावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही सडकून टीका केली होती. सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी त्याला जागतिक भिकाऱ्याची उपमा दिली होती.