आपल्या बोलीभाषेतील मराठी गाणी आणि मराठी मालिकांची शीर्षक गीतं फार प्रसिद्ध होत आहेत. अश्याच काही लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. नुकताच त्यांना एका पुरस्कार सोहळ्यात 'योगयोगेश्वर जयशंकर' या मालिकेसाठी 'लोकप्रिय शीर्षक गीता'चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी त्यांना 'बीग मराठी एंटरटेनमेंट' पुरस्कार सोहळ्यात 'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीताच्या' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय संगीतकार कुणाल करण यांना 'प्रोमॅक्स इंडिया' सोहळ्यात 'बॅंड बाजा वरात' या मालिकेसाठी 'बेस्ट ओरिजनल म्युझिक वीथ लीरीक्स' असं नामांकन देखील मिळालं आहे.
आत्तापर्यंत त्यांनी महामिनिस्टर, किचन कल्लाकार, बस बाई बस, नवा गडी नवं राज्य, बॅंड बाजा वरात, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई ? अश्या तब्बल १४ मालिकांच्या 'शीर्षक गीतांना' संगीतबद्ध केलेले आहे. संगीतकार कुणाल करण पुरस्कारांविषयी सांगतात, "आधी बीग मराठी एंटरटेनमेंट आणि आता कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत' आणि 'लोकप्रिय शीर्षक गीता'चा पुरस्कार मिळणे म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत आहे. एका कलाकाराला नेहमी हेच हवं असतं की तुम्ही जे काम करता त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळावं आणि कौतुकाची थाप मिळावी. आज प्रेक्षकांच इतकं प्रेम मिळत आहे याचा खूप आनंद आहे. इंजिनीअरिंगनंतर आम्ही दोघांनी जे निर्णय घेतले की आपण आपल्याला आवडत ते काम करूया. आज त्या निर्णयाबद्दल दोघांनाही पच्छाताप होत नाही आहे."
पुढे ते सांगतात, "संगीत क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यापासून आमची स्वप्न उंचावली आहेत, आमचं कुटुंब त्या स्वप्नपूर्तीसाठी नेहमी आमच्या पाठीशी उभं असतं. या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवोदितांना ही आम्ही सांगू इच्छितो की एखादं काम खूप मनापासून करा, ज्या क्षेत्रात काम कराल त्यात योग्य मार्ग निवडता आला पाहिजे आणि भरपूर मेहनत केली पाहिजे, मग पुढची वाटचाल खूप सोपी जाते." पुढे ते आगामी प्रोजेक्ट्सविषयी सांगताना म्हणाले, "अथांग सारख्या प्लॅनेट मराठीच्या वेबसिरीजचं संगीत केल्यानंतर आता आम्ही हिंदी चित्रपटासाठी आणि हिंदी वेबसिरीजसाठी संगीत दिग्दर्शन करत आहोत. लवकरच काही चित्रपट तुमच्या समोर येतील आणि त्या प्रोजेक्ट्सला ही तुमचा भरभरून प्रतिसाद मिळेल हीच आमची अपेक्षा आहे."