सांगली : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकरांच्या एका वेब सिरीजमध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमान करणारा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे. याविरोधात बँड कलाकार आक्रमक झाले असून महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची इशारा दिला आहे.
महेश मांजरेकर यांनी बँड कलाकारांबद्दल केलेला वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून आता बँड कलाकार वादकांनी महेश मांजरेकर यांच्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. समस्त बँड कलाकारांचा हा अपमान असून त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभर बँड कलाकार आंदोलन करतील आणि प्रसंगी मांजरेकर यांच्या घरासमोर देखील बँड बाजा आंदोलन करण्यात येईल.
तसेच मांजरेकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि त्यांचा सिनेमा देखील प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी कलाकार महासंघाच्या वतीने अनिल मोरे यांनी दिला आहे. याप्रकरणी सांगली बँड कलाकारांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, काळे धंदे ही वेब सीरिज २०१९ साली झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये शुभंकर तावडे आणि निरंजन जावीर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये एका बँड पथकाला लग्नसोहळ्यात खालच्या दर्जाची वागणूक देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. ही सीरिज त्यावेळी प्रचंड गाजली होती. परंतु, यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.