नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात जीवघेणा हल्ला झाला आहे. एका संगीत कार्यक्रमादरम्यान कैलाश खेर यांचा स्टेजवर परफॉर्म सुरु असतानाच दोन मुलांनी त्यांच्यावर बाटल्या फेकल्या. यामध्ये कैलास खेर यांना दुखापत झाली आहे का? याबाबत अधिकची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांला ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, कर्नाटकात तीन दिवसीय हंपी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी २९ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालला. या महोत्सवात अनेक नामवंत गायकांनी आपल्या गायनाने सादरीकरण केले. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही महोत्सवात आपल्या गाण्यांनी लोकांना थिरकरायला लावले. पण, दोन मुलांनी कन्नड गाण्यांची मागणी सुरू केली. गाण्याची मागणी करत असताना त्यांनी स्टेजवर परफॉर्म करत असलेल्या कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकली. यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, तीन दिवसीय हंपी महोत्सव 27 जानेवारीपासून सुरू झाला आणि 29 जानेवारीपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि कन्नड गायकांनी परफॉर्म केले. त्यात जागतिक वारसा स्थळाचे वैभव दाखविण्यासाठी ध्वनी आणि प्रकाश शोचाही समावेश होता. कन्नड पार्श्वगायक अर्जुन, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले. त्याच वेळी बॉलिवूडमधून अरमान मलिक आणि कैलाश खेर सामील झाले.