मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’

'फुलवंती'.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती. ही अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

'फुलवंती'.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती. ही अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपला ठसा उमटविणारी चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने 'फुलवंती' ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवो हम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता सांगते, ‘फुलवंती' सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या सोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.

अमोल जोशी प्रोडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : राज ठाकरेंना धक्का; अमित ठाकरेंचा पराभव, महेश सावंत यांचा विजय

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव

शरद पवार गटाला अजित पवारांचा दे धक्का; सचिन पाटील विजयी