संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण 2021-22 अहवाल लोकसभेत सादर केला. या अहवालाद्वारे त्यांनी चालू आर्थिक वर्षात (2021-22) अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आगामी आर्थिक वर्षासाठी (2022-23) अर्थव्यवस्थेच्या संभाव्य स्थितीची सविस्तर माहिती दिली.
आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा विकासदर 8-8.5% असेल. अर्थात विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे 9% पेक्षा तो कमी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर 9.2% राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कृषी क्षेत्र 3.9%, उद्योग 11.8%, सेवा क्षेत्र 8.2% वाढले, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच चालू आर्थिक वर्षात 75 कंपन्यांनी आयपीओद्वारे तब्बल 89,066 कोटी रुपये उभारले. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महागाईत घट होऊन ती 5.2 टक्क्यांवर आली. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अन्न महागाईत 2.9 टक्क्यांची घट. रेल्वेच्या भांडवली खर्चात पाच पटीने वाढ. 2020-21 मध्ये रस्त्यांची बांधकामे प्रतिदिन 36.5 किमी पर्यंत वाढले. मागील वर्षीच्या तुलनेत 30.4 टक्क्यांनी वाढ झाली. 31 डिसेंबर 2021 रोजी परकीय चलन राखीव 633.6 अब्ज डॉलरवर पोहोचले.अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासह 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत रोजगार निर्देशक पूर्व-प्रकोप स्तरावर परतला.
उद्या म्हणजे मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सीतारामन सादर करतील.