कर्नाटकमध्ये सध्या हिजाब प्रकरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने काढण्यात आली असून त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेले पाहायला मिळत आहेत. शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये मुस्कान नावाची तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत 'अल्लाहू अकबर' ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 'पहिले हिजाब फिर किताब' हर किमती चीज परदे में होती है, Hijab is our Right असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.अशा आशयाचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समुळे सध्या शहरामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली. बीड शहराच्या बशीर गंज चौकामध्ये अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.यासर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिकिया दिली आहे.वळसे पाटील म्हणाले की, "कर्नाटकात हिज़ाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे." माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये, असं ट्वीट करत दिलीप वाळसे पाटलांनी माध्यमांना टॅग करुन या विषयांना फारसं महत्व देऊ नका असे सांगितले.