किरण नाईक: संपूर्ण जगावर मागील साधारण दोन वर्षांपासून कोरोनाचं सावट आहे. मागील काही काळात ते सावट जरा कमी झालेलं पाहायला मिळतंय. परंतू, चीनमध्ये व जगातील अन्य काही ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव पून्हा वाढत असल्या कारणाने पून्हा लॉकडाऊन लागत आहे.
आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली. ह्या बैठकीत जिल्ह्यातील मागील काही दिवसांच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय कमी झाला असून 90 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी कोरोनाची पहिली लस तर 70 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असल्याने येत्या काळात नाशिकमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध शंभर टक्के उठवण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
'जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे, महाराष्ट्रात जगभरातून लोक येत असतात. तसेच आता उत्तर प्रदेशच्या निवडणूका संपल्या आहेत त्यामूळे तिकडचा लोंढाही आता महाराष्ट्रात येईल.' असं म्हणत निर्बंध उठविण्यास वेळ का लागतोय ह्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी भाजपला टोलाही लगावलाय.