गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीची रणनीती आखण्याच्या कामात लागला आहे. अशातच आता आम आदमी पक्षाने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमित पालेकर हे आप'चे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहेत.
अरविंद केजरीवाल म्हणाले,गोव्यातील जनतेला आता परिवर्तन पाहिजे. त्यांच्याकडे आतापर्यंत पर्याय नव्हता, परंतु,आता आम आदमी पक्ष गोव्यात आला आहे. येथील जनता अमित पालेकर यांना साथ देईल आणि आम आदमी पक्षाला गोव्यातील लोकांची सेवा करण्याची संधी देईल.असे ते म्हणाले.
"अमित पालेकर हे पेशाने वकील आहेत आणि ते भंडारी समाजातून आले असून ते गोव्यातील प्रत्येक समाजातील लोकांना मदत करत आहेत. कोरोना काळात गोव्यातील नागरिकांसाठी त्यांनी सर्वाधिक मदत केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोव्यात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला असताना अमित पालेकर यांनीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती."गोव्यात भंडारी समाजाच्या लोकांना प्रगतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या समाजातील लोकांनी रक्त आणि घाम गाळून गोव्याच्या प्रगतीसाठी हातभार लावला आहे. गोव्यातील जनता विद्यमान पक्षांना कंटाळली असल्याचे ते म्हणाले.