Dhule Shirpur Ganja : निसर्गसंपन्न सातपुड्याच्या डोंगररांगांत नशेची शेती
निसर्गसंपन्न सातपुड्याच्या डोंगररांगांत नशेची शेती पाहायला मिळत आहे. धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती सध्या जोरात सुरु आहे. कपाशी, तुरीच्या आडून गांजाची शेती सुरू होती. धुळे पोलिसांनी संपूर्णपणे गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. गांजा शेतीचं एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाहीच्या हाती लागलेला आहे. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? असा सवाल या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित होत आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही नशेची पाळंमुळं आता रुजताना पाहायला मिळत आहे.
इथे बहुसंख्य भागात आदिवासी जमातींचे प्राबल्य आहे. हा भाग छोट्या छोट्या टेकड्यांनी बनलेला आहे. यामुळे येथे पोहोचण अवघड असल्यानं याचाच फायदा अवैध व्यवसायिकांनी घ्यायला सुरू केलीय. यामुळे गेल्या काही वर्षांपासून धुळे जिल्हा महाराष्ट्रातल्या गांजा शेतीच प्रमुख केंद्र बनलाय. अशीच अनेक एकर मधील गांजाची शेती शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांनी उध्वस्त केली आहे. सांगवी शहर परिसरातील लाकड्या हनुमान भागामध्ये तूर आणी कापूसच्या आडून ही शेती केली जात असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी सांगितल आहे.
नेमकं किती क्षेत्रामध्ये ही शेती केली जात होती याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नसून क्षेत्र जास्त असल्याने ड्रोनच्या साह्याने पोलिसांकडून या शेतीच मोजमाप केल जातंय. याआधी वन जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्यामुळे आरोपी निष्पन्न करणं अशक्य होतं, मात्र या प्रकरणात पोलिसांनी आधी सुरज पावरा, रोहित पावरा, समीर पावरा आणि रसीलाल पावरा या चौघांना ताब्यात घेऊन त्यानंतर कार्यवाही करत ही शेती उध्वस्त केली आहे. या शेतीची किंमत 50 लाखांहून अधिक असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.