शेतकऱ्यांची फसवणूक! अमरावती जिल्ह्यात बॅगेत डीएपी खताच्याऐवजी चक्क माती
शेतकऱ्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आहे. जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यातील खत निर्माण करणारी रामा फर्टीकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 3 हजार 300 बॅग डीएपी आणि 10:26:26 या खताच्या 2100 बॅग अशा 5 हजार 400 खतांच्या बॅगची विक्री केली आहे. यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मात्र, आता या कंपनीचे 453 खतांचे पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये एका अधिकाराविरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्रीच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितल आहे.