Farmers: शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार, जीआर जारी; कसं ते जाणून घ्या
राज्यातील शेतकऱ्यांसाठी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना - 2024" शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता 7.5 अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने धोरण ठरविले. त्यानुसार आता "एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत राज्यात "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना - 2024" राबविण्यात येत आहे. तथापि, या योजनेचा 3 वर्षांत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या योजनेमुळे, सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे 6,985 कोटी रुपये तसेच वीज दर माफीनुसार 7,775 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे एकूण 14,760 कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाने जारी केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.