जगाने अनुभवलं प्रजासत्ताक दिनी राजपथावर देशाचं सामर्थ्य
आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच २३ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती, तर ३० जानेवारीला शहीद दिवस आहे.
यंदाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसणार आहेच शिवाय 1971च्या युद्धात पाकिस्तानची दैना करणारे विंटेज रणगाडे आणि तोफांचे दर्शन घडणार आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवणारे PT-76 आणि सेंच्युरियन रणगाडे राजपथावरील परेडमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतील. हा विंटेज टँक आता लष्कराच्या युद्ध ताफ्याचा भाग नाही आणि त्याला खास संग्रहालयातून परेडसाठी बोलावण्यात आले आहे. नुकतेच देशात 1971 च्या युद्धाचे सुवर्ण विजय वर्ष साजरे झाले. याशिवाय 75/24 विंटेज तोफ आणि टोपाक आर्मर्ड पर्सनल कॅरियर व्हेईकल देखील परेडचा भाग असेल. 75/24 तोफ ही भारताची पहिली स्वदेशी तोफ होती आणि तिने 1965 आणि 1971 च्या युद्धात भाग घेतला होता. यासह आकाशात हेलिकॉप्टरचे डायमंड फॉर्मेशन दिसेल.
विंटेज मिलिटरी हार्डवेअर व्यतिरिक्त, आधुनिक अर्जुन टँक, BMP-2, धनुष तोफ, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, सावत्रा ब्रिज, टायगर कॅट मिसाइल आणि तरंग इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीसह एकूण 16 यांत्रिक स्तंभ परेडमध्ये सामील आहेत.